Ad will apear here
Next
देविका राणी, पं. अनंत मनोहर जोशी
अभिनेत्री देविका राणी यांचा आठ मार्च हा स्मृतिदिन. ग्वाल्हेर परंपरेतले एक थोर गायक व गुरू पं. अनंत मनोहर जोशी यांचा आठ मार्च हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
......
देविका राणी
३० मार्च १९०८ रोजी देविका राणी यांचा जन्म झाला. देविका राणी चौधरी हे देविका राणी यांचे पूर्ण नाव. रवींद्रनाथ टागोरांच्या भगिनी सुकुमारीदेवी या त्यांच्या आजी. देविका राणी जेव्हा लंडनमध्ये स्थापत्यशास्त्र शिकत होत्या, तेव्हा तेथे त्यांचा परिचय कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या हिमांशू रॉय यांच्याशी झाला. हिमांशू रॉय यांना नाटक आणि चित्रपटांत अतिशय रस होता. त्यांनी देविका राणीला आपल्या ‘लाइट ऑफ एशिया’ या चित्रपटाच्या नेपथ्यासाठी बोलावले. नंतर त्यांनी लंडनमध्ये असतानाच देविका राणींना घेऊन ‘करमा’ नावाचा हिंदी-इंग्रजी चित्रपट बनवला. तो प्रदर्शित झाल्यावर ‘स्टार लंडन’च्या समीक्षकाने लिहिले होते की, ‘देविका राणी यांचे सौंदर्य आणि इंग्रजीचे उच्चारण याला चित्रपटसृष्टीत तोड नाही.’ 

नंतर हिमांशू रॉय देविका राणीला घेऊन जर्मनीत गेले आणि त्यांनी तिथे रंगमंचांवर भूमिका केल्या. पुढे लग्नही केले. लंडन आणि बर्लिन येथे नाव मिळवल्यावर हिमांशू रॉय मुंबईत आले. लंडनहून चित्रपटाच्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेऊन मायदेशी परतलेल्या हिमांशू रॉय, राजनारायण दुबे आणि देविका राणी यांनी १९३४ मध्ये ‘बॉम्बे टॉकीज’ या संस्थेची स्थापना केली. बॉम्बे टॉकीजच्या मुंबईतल्या स्टुडिओत चित्रपट निर्मितीसह ध्वनिमुद्रण, संकलन, कपडेपट, यासह सर्व सुविधा होत्या. या संस्थेच्या तिन्ही संस्थापकांनी चित्रपट हे समाज प्रबोधनाचे प्रभावी साधन आहे, याचे भान कायम ठेवून सामाजिक, कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटांची निर्मिती केली. त्या काळात चांगली कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या घरातल्या मुलींनी चित्रपटात काम करणे हे सामाजिक अप्रतिष्ठेचे लक्षण मानले जाई. गरीब घरातल्या गरजू मुली अभिनेत्रीचे काम करीत. पण त्यांच्याबद्दलही समाजात चर्चा होत असे. मुलांना तर चित्रपट पहायला परवानगीच नव्हती. अशा काळात बॉम्बे टॉकीजने चित्रपटसृष्टीला वैभव मिळवून दिले. चित्रपटाबद्दलची जनतेची नजरही बदलून टाकली. प्रेक्षकवर्ग चित्रपटांकडे वळवला. 

देविका राणी या संस्थेच्या चित्रपटात भूमिका करीत. नंतर त्यांनी हिमांशू रॉय यांच्याशी विवाह केला. ‘बॉम्बे टॉकीज’ ही संस्था फक्त चित्रपट निर्मितीचा स्टुडिओ नव्हता. या संस्थेने हिंदी आणि अन्य भाषातल्या चित्रपटसृष्टीला शेकडो कलाकार, तंत्रज्ञ, संगीतकार, अभिनेते, अभिनेत्री दिल्या. दिलीपकुमार, देवआनंद, केदार शर्मा, सत्यजित रे यांच्यासह अनेक दिग्गजांचा चित्रपटसृष्टीतला प्रवेश याच संस्थेत झाला. या संस्थेत सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ हे मासिक वेतनावर काम करीत असत. हिमांशू रॉय आणि राजनारायण दुबे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या कर्तबगारीने आणि दर्जेदार चित्रपट निर्मितीने प्रतिष्ठा मिळवून दिली. अछूत कन्या, बंधन, किस्मत, हम सब एक हैं, जिद्दी यासह सर्वोत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती याच संस्थेत झाली. 

अशोक कुमार यांची भूमिका असलेला ‘किस्मत’ हा चित्रपट लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला होता. मुंबईतल्या एकाच चित्रपटगृहात सलग ३५० दिवस तो चालला होता. त्या संस्थेत शशधर मुखर्जींचे नातेवाईक अशोक कुमार गांगुली फिल्म लॅबॉरेटरीत काम करीत होते. सन १९३३ मध्ये प्रदर्शित झालेल्या कर्मा या चित्रपटात अभिनेत्री देविका राणी व अभिनेता हिमांशू राय यांनी चार मिनिटांचे चुंबनाचे दृष्य दिले होते. (खऱ्या खुऱ्या आयुष्यात ते पती-पत्नी होते). हे हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले चुंबन दृश्य असावे. देविका राणींनी सुचवल्यामुळे हिमांशू रॉय यांनी अशोक कुमार आणि देविका राणी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘अछूत कन्या’ नावाचा हिंदी चित्रपट १९३६ मध्ये केला. ब्राह्मण तरुण आणि हरिजन युवती यांची कथा असलेला हा चित्रपट अतिशय गाजला. त्या वेळी हिमांशू रॉय यांचा मुख्य तंत्रज्ञ जर्मन होता. दुसरे जागतिक महायुद्ध सुरू झाल्यामुळे त्या तंत्रज्ञाला भारत सोडून जावे लागले. त्यामुळे हिमांशू रॉय यांना आपले अर्धवट राहिलेले चित्रपट पूर्ण करण्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागली. त्यांतच त्यांचा अकाली मृत्यू झाला आणि सर्व जबाबदारी देविका राणींवर पडली. 

संस्थेचे भागीदार शशधर मुखर्जी यांनी, हिमांशू रॉय यांचे समाज प्रबोधन विषयांवरील चित्रपट करण्याचे धोरण बदलून गल्लाभरू चित्रपट करण्याचे ठरवले. हे देविका राणींना आवडले नाही, त्यांनी चित्रपट संस्थेतून आपली भागीदारी काढून घेतली. त्यांनी पुढे रशियन चित्रकार सोव्हित्सलाव्ह रोरिच यांच्याशी विवाह केला आणि ते दोघे बेंगळुरूमध्ये स्थायिक झाले. १९७० साली देविका राणींना त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल पहिलाच दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. देविका राणी यांचे आठ मार्च १९९४ रोजी निधन झाले. 
.........
पं. अनंत मनोहर जोशी
आठ मार्च १८८१ रोजी पं. अनंत मनोहर जोशी उर्फ पं. अंतुबुवा जोशी यांचा जन्म झाला. ते पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य. अनंत मनोहर जोशी यांचे वडील मनोहरपंत औंध संस्थानातील किन्हई गावचे. औंधच्या संस्थानिकांनी त्या काळी अनंत मनोहर जोशी यांच्या शिक्षणासाठी महिना तीन रुपये शिष्यवृत्ती दिली होती. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी तीन रुपये शिष्यवृत्ती ही मोठी मानाची गोष्ट. पं. अनंत मनोहरांचे वडील ते पाच-सहा वर्षांचे असतानाच गेले. मनोहरपंत हे त्या काळातील विख्यात धृपद धमार गायक होते. ते औंध संस्थानात राजदरबारी सरकारी गायक होते; पण अनंत मनोहरांना मात्र त्यांच्याकडून तालीम मिळू शकली नाही. पित्याचं छत्र इतक्या लवकर हरपलं खरं, पण मुलाचा आवाज चांगला आहे आणि वडील गेले तरी मुलाचं नुकसान होता कामा नये, याची जाणीव ठेवत त्यांच्या आईनं अनंत मनोहरांना पं. बाळकृष्णबुवांकडे सोपवलं. 

त्या वेळेस पं. विष्णू दिगंबर पलुस्कर आणि पं. गुंडुबुवा इंगळे अनंत मनोहरांचे सहाध्यायी होते, आणि ही त्रयी ‘अंतू, विष्णू, गुंडू’ म्हणून प्रसिद्ध होती. अंतूबुवा आणि विष्णूबुवा दोघाही गुरूबंधुंना संगीत शिक्षणाचा प्रसार व्हावा आणि त्यासाठी संगीत विद्यालये स्थापन व्हावीत असे वाटत होते. त्याप्रमाणे विष्णुबुवांनी लाहोरला १९०५ साली पहिले संगीत विद्यालय स्थापन केले आणि अंतूबुवांनी १९०७ मध्ये गिरगावात संगीत विद्यालय स्थापन केले. त्या वेळेस अशा संगीत शिक्षणाची नितांत गरज भासत असल्यानं त्यांच्या संगीत विद्यालयाचा लवकरच विस्तार झाला, ‘प्रिन्सिपॉल जोशी’ म्हणून ते प्रसिद्धही झाले. मग १९२१ मध्ये विद्यालय बंद करून त्यांनी मुंबई सोडली. गाण्याचे कार्यक्रम करून अर्थार्जन करून दोघांचा चरितार्थ कसाबसा चालला होता. पण पुन्हा दैव हसले, प्रसन्न झाले. औंध संस्थानात नोकरी लाभली. औंधचे संस्थानिक स्वत: कीर्तने करीत. संगीताची त्यांना आवड होती. कीर्तनाला साथ करायला ते अंतुबुवांना सांगत. देवीच्या देवळात रोज गाण्याची हजेरी लावणे हेही अंतुबुवांचे काम असे.

पुढे ते औंध संस्थानाचे राजगायक झाले. त्यांनी औंध येथे राहून अनेक शिष्य तयार केले. पं. अनंत मनोहर जोशी हे संगीताचार्य आणि वादनाचार्य म्हणून प्रसिद्ध होते. आयुष्यभर विद्यादानाच्या पवित्र कार्यात गुंतलेले होते. जे आपल्याला मिळालं आहे ते भरभरून इतरांना द्यावं यावर दोघांचीही नितांत श्रद्धा होती, त्यामुळे विद्यादानाचं अग्निहोत्र अखंड तेवत राहिलं. संगीत शिक्षणाची गरज लक्षात घेऊन पं. अनंत मनोहर जोशी यांनी गिरगावात श्री गुरु समर्थ गायन वादन विद्यालय सुरू केले. गाण्याबरोबरच तबला, हार्मोनियम, जलतरंग, सतार अशी वाद्ये ते स्वत:च शिकवत असत.१९४० साली पं. अंतुबुवांनी औंध येथे आपले आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या अस्थी ठेवलेल्या जागी दत्त मंदिर बांधले व आपल्या गुरूंच्या पुण्यतिथीला आश्विन वद्यपंचमी ह्या दिवशी संगीत सेवा सुरू केली. पं. अंतुबुवांना १९५५ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला होता. अनंत मनोहर जोशी यांचे निधन १२ सप्टेंबर १९६७ रोजी झाले.
माहिती संकलन : संजीव वेलणकर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZVUCK
Similar Posts
अब्दुल हलीम जाफर खान, पं. उल्हास बापट, सर आयझॅक पिटमॅन ज्येष्ठ सतारवादक अब्दुल हलीम जाफर खान, ख्यातनाम संतूरवादक पं. उल्हास बापट आणि लघुलिपीचे (शॉर्टहँड) जनक सर आयझॅक पिटमॅन यांचा चार जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...
पं. प्रभुदेव सरदार, पं. रमेश मिश्र, विलायत खाँ ज्येष्ठ गायक पंडित प्रभुदेव सरदार, प्रख्यात सारंगीवादक पंडित रमेश मिश्र आणि ज्येष्ठ सतारवादक विलायत खाँ यांचा १३ मार्च हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय....
पद्मा गोळे, भक्ती बर्वे, दत्ता मारुलकर मराठी कवयित्री, लेखिका, नाटककार पद्मा गोळे, नामवंत अभिनेत्री भक्ती बर्वे-इनामदार आणि संगीत समीक्षक-लेखक दत्ता मारुलकर यांचा १२ फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय....
दि. बा. मोकाशी, गणेश मावळणकर, बप्पी लाहिरी ज्येष्ठ लेखक दि. बा. मोकाशी, पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष गणेश मावळणकर आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचा २७ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language